उस्मानाबाद- जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख हे दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी जिल्ह्यातील वाशी, कळंब सह इतर तालुक्यातील कोविड सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरला भेटी देत पाहणी केली. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी जेवणासह,सोयी सुविधांबाबत अनेक तक्रारी पालकमंत्र्यांकडे केल्या होत्या. त्याच अनुषंगाने पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाभर भेटी देत परिस्थितीची पाहणी केली.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजारांच्या वर गेली असून 94 जणांचा मृत्यू देखील झालाय.वाढलेले मृत्यू ही धोक्याची घंटा असून कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ही चिंतेची बाब असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले. तसेच याबाबत जिल्ह्यात सर्वत्र भेटी देऊन प्रशासनाबरोबर बैठक घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पालकमंत्र्यांच्या भेटीवेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ.दिपा मुधोळ- मुंडे, आमदार कैलास पाटील यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.