उस्मानाबाद- पदवीधर मतदार संघाची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवाराच्या खर्चातून पदवीधर आणि कार्यकर्ता मेळावा आज घेण्यात आला. मात्र, तरीही मेळाव्याला पदवीधरांची म्हणावी तशी गर्दी झाली नाही. त्यामुळे वृद्ध महिलांची जमवाजमव करून मेळाव्यातील गर्दी वाढवण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केल्याचे दिसून आले.
सध्या, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आज उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पदवीधर आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाला पदवीधर मतदारांनी म्हणावी तशी हजेरी लावली नाही. त्यामुळे अशिक्षित वृद्ध महिलांना घेऊन हा मेळावा पार पाडावा लागला. मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांशी संवाद साधला तर महिलांनी मेळाव्यामधील काही समजले नाही. काही ऐकू आले नाही, असे सांगितले. त्यावेळी बाजूलाच असलेल्या कार्यकर्त्याने महिला मेळाव्याचे भाषण ऐकण्यासाठी आल्या होत्या, असे सांगितले.
हेही वाचा-'तेर' येथील गोरोबा काकांचे मंदिर २ दिवसांसाठी बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मेळाव्यापूर्वी महावितरणचा शॉक-
मेळाव्यासाठी सर्वांना सकाळी दहाची वेळ देण्यात आली होती. कार्यकर्तेदेखील तयारीला लागले होते. मात्र, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अचानक वीज पुरवठा बंद झाला. त्यामुळे कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागली. जलसंपदा मंत्री जयंत पाटील येणार असताना विजच नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धावपळ करत होते. साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे कार्यक्रमस्थळावर वीज पुरवठा सुरळित झाला नव्हता. राज्यमंत्री संजय बनसोडे हे कार्यक्रमात येण्यापूर्वी काही मिनिट अगोदर वीज आल्याने कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
हेही वाचा-'शरद पवार महाराष्ट्राचे मोठे नेते तर अर्जुन खोतकर माझे चांगले मित्र'
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यापासून शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यक्षम करण्यासाठी स्थानिक नेते धडपडत आहेत. त्यातच उस्मानाबाद जिल्ह्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रचारात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडत आहे.