उस्मानाबाद - वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळंब शहरातील महावितरण कार्यालयात तोडफोड करत तुफान राडा केला आहे.
वीज बिल माफ करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. महावितरण याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे म्हणत मनसे आक्रमक झाली. यावेळी मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयातील खुर्ची, काचा फोडल्या. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. यातच रोजगार नसल्याने जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड सुरू केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसे तालुकाध्यक्ष सागर बारकूल, शहराध्यक्ष अमोल राऊत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - धक्कादायक; चरित्र्याच्या संशयावरून पत्नीसह सासूची कुऱ्हाडीने हत्या, परिसरात दहशत