उस्मानाबाद - कोरोना विषाणूच्या सावटाखाली यंदा प्रत्येक सण अगदी साध्या पद्धतीने साजरा होत आहे. गुरुवारी वसुबारस होते. तर, आज धनत्रयोदशी आहे. यानिमित्त खरेदीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लहान मोठ्या बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची फारशी गर्दी नसल्याने व्यावसायिक समाधानी नसल्याचे दिसत आहे.
दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण दिसून येते. गणेशोत्सव व दसऱ्यानंतर आता दिवाळीत कोरोना लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा बाजारपेठेला थोडी ऊर्जा मिळाली आहे. नवनवीन संकल्पना व उत्पादने घेऊन व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसत आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने आपआपल्या संकल्पनेतून दुकानांची सजावट व वस्तूंची मांडणी करून ग्राहकांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला आहे.
हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर -
शहरातील पोस्ट ऑफीस ते नेहरू चौक या प्रमुख मार्गासह मारवाडी गल्ली, गवळी गल्ली आदी ठिकाणी नागरिक हळूहळू खरेदीसाठी बाहेर येत आहेत. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद करण्यात आला होता. त्यामुळे खरेदीसाठी लोकांना बाहेर पडता येत नव्हते. मात्र, आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.