उस्मानाबाद - उद्घाटक ना. धो. महानोर यांना संमेलन सुरू होण्यापूर्वीच काही संघटनांकडून धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ना.धो. महानोर हे उद्घाटन प्रसंगी काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. 'मी संमेलनाला आलोय... तुमच्या समोर आहे...पाहून घ्या' म्हणत त्यांनी धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. आज (शुक्रवारी) 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा उद्घाटन समारंभ उस्मानाबादमध्ये पार पडला यावेळी उद्घाटक महानोर बोलत होते.
हेही वाचा - ...चक्क साहित्य संमेलनातच बनावट पुस्तकांची विक्री!
सध्या देशात भेडसावत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी साहित्यिकांनी पुढे येणे गरजेचे आहे. आज उस्मानाबाद सारख्या शहरात हे संमेलन पार पडत आहे याचा अभिमान आहे. फक्त सत्काराचा एक टिळक साहित्यिकाला लागावा हीच त्याची अपेक्षा असते. लेखनात आठ वर्षात मराठवाड्याला तीन पुरस्कार मिळाले आहेत. साहित्याचा मोठा वारसा मराठवाड्याला आहे. त्यामुळे कोणी कमी समजु नये. सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्याना फटका सहन करावा लागत आहे. मी ही शेतकऱ्याचाच मुलगा आहे. त्यामुळे पाणी अडवून जिरवले तर शेतकरी सुजलाम सुफलाम होईल असा आशावाद महानोर यांनी व्यक्त केला.
साहित्यिक कोणता मोठा नसतो तर साहित्य कसे मोठे होईल यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता साहित्यिकांनी गळ्यात गळे घालून चालावे, शिवाय सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही अध्यक्षांची निवड ही बिनविरोध होत असते ही जमेची बाजू असल्याचे महानोर म्हणाले. अध्यक्ष निवडीला विरोध करणाऱ्यांना महानोरांनी चांगलेच झापले.
कालपासून साहित्य संमेलनाला ना. धो. महानोर उपस्थित राहणार की नाही यावरून साशंका उपस्थित केले जात होते. मात्र उपस्थित राहून त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
हेही वाचा - 'उपमुख्यमंत्र्यांच्या भल्या सकाळच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची दमछाक'