उस्मानाबाद - कोरोना विषाणूचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत चालले आहे. याबरोबरच पावसाळा असल्याने लोकांना इतर संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक कुठल्याही उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे साथीच्या आजाराला लगाम बसला आहे की, काय असा प्रश्न पडतो. या संबंधी 'ईटीव्ही भारत'ने ग्रामीण भागात काम करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला.
ग्रामीण भागातील लोक संसर्गजन्य आजारांबरोबरच वेगवेगळ्या अफवांना बळी पडत असल्याचे मत डॉ. शिवाजी पाटील यांनी व्यक्त केले. पाटील यांचे उस्मानाबाद तालुक्यातील करजखेडा चौरस्त्यावर रुग्णालय आहे. त्यांच्याकडे आजूबाजूच्या 20 गावातील लोक उपचारासाठी येतात. पाटील यांनी लोकांच्या मनात कोरोनाशी संबंधित असलेले गैरसमज जाणून घेतले आहेत.
कसलाही संसर्गजन्य आजार झाला की, लोकांचे घरगुती उपचार घेण्याचे प्रमाण वाढले आहे. घरगुती उपाय करून किंवा स्वतःच एखादे औषध घेऊन आजार दाबण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांना कोरोना विषाणूबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळालेले नाही. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर डॉक्टरांना पैसे मिळतात, अशी अफवा असून कोरोनामुळे एखादा रुग्ण मृत झाला तर त्याची किडनी काढून घेतली जात असल्याची चुकीची भीती लोकांच्या मनात पसरली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - 10-12 वर्षात पुढं आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत, एकनाथ खडसेंचा स्वकीयांवर घणाघात
ग्रामीण भागातील नागरिक कोणताही आजार झाला तरी रुग्णालयात येत नाहीत. पावसामुळे येणाऱ्या डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजारांना लोक उपचाराअभावी बळी पडत आहेत. सध्या जे काही रुग्ण आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही योग्य ते मार्गदर्शन करून सल्ला देत आहोत. मात्र, अफेवेच पेव मोठे आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी आणि संसर्जन्य आजारासंबंधी जनजागृती होणे गरजेचे आहे. तरच कोरोना विषाणू आणि इतर आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - "मुलीला शेवटचे पहायचे होते", परभणीतील कोविड वॉर्डमधून पळ काढणाऱ्या गुन्हेगाराची कबुली