उस्मानाबाद - शिवसेनेत लक्ष्मीपुत्र अशी ओळख असलेले आमदार डॉ. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे, आज जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरातील खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात ही बैठक पार पडली.
जिल्ह्यात शिवजलक्रांतीच्या माध्यमातून आमदार सावंत यांनी जिल्ह्यात मोठे काम केले. तसेच जिल्ह्यातील शिवसेना वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. सावंत यांनी परंडा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल मोटे यांचा पराभव केला होता. राहुल मोटे हे गेल्या तीन सत्रापासून परंडा मतदार संघाचे आमदार होते. मोटे यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव करत डॉ. सावंतांनी विजय मिळविला होता. तसेच याच निवडणुकीत आमदार सावंत यांना मंत्री करण्याचे आश्वासन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे, आमदार सावंत याना मंत्रिमंडळात स्थान मिळावे याकरिता आता शिवसैनिक आक्रमक झाले आहे. शिवसैनिकांकडून तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यावर मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात येणार आहे. आमदार सावंत यांना मंत्रिपद मिळावे यासाठी शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनधरणी करणार आहेत.
हेही वाचा- ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तयारीत चिमुकल्यांचा हातभार