उस्मानाबाद - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
विद्यमान मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे जुने व्हिडीओ दाखवत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री असताना राज्यात अतिवृष्टीचं संकट ओढावलं होतं. त्यावेळी फडणवीसांनी हेक्टरी 10 हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात हेक्टरी 25 हजार रुपये मदतीची मागणी केली होती.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही फडणवीस सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत पुरेशी नसल्याचं सांगितलं होतं. आणि हेच व्हिडीओ आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राबवलेल्या 'लाव रे तो व्हिडीओ'चा अवलंब करत फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अद्याप कुठलाही दिलासा मिळालेला नाही, असे ते म्हणाले.