उस्मानाबाद - मराठी माणसाचा कळवळा असल्यास उद्धव ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाची भेट घ्यावी आणि त्यांना धीर द्यावा, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना केले.तुम्ही राहुल गांधी यांची मर्दानगी काढण्यापेक्षा किंवा शरद पवारांना काही बोलण्यापेक्षा तुमच्यात जर खरंच हिम्मत असेल, तर तुम्ही दिलीप ढवळे या शेतकर्याच्या कुटुंबाला नक्कीच भेट द्या व तुमची मर्दानगी दाखवा. आम्ही कधीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
दिलीप ढवळे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. उस्मानाबाद येथे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी आर्थिक फसवणूक केली म्हणून जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली, या शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या चार एकर जमिनीवर तो बोजा चढविण्यात आला होता आणि या कर्जाची रक्कम तेरणा कारखान्यासाठी वापरण्यात आली होती. ही रक्कम तेरणा कारखाना फेडेल अशी हमी देण्यात येऊनही रक्कम फेडली नाही. ढवळे यांनी आत्महत्या केली व त्याचे कारण आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आहे. त्याचबरोबर या जमिनीचा लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे गावात बदनामी झाल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे लिहिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ढवळे यांनी पोलिसात तक्रार देखील दिली होती. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबई गाठली होती. मात्र, उद्धव ठाकरेंची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे निराश होऊन ढवळे यांनी आत्महत्या केली.