जळगाव - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी माझ्यावर केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि हास्यास्पद आहेत. राजकारणात त्यांना आता काहीही काम उरलेले नसल्यानेच ते असले फाजिल उद्योग करत आहेत, अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंवर पलटवार करत त्यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एकनाथ खडसे, त्यांचे समर्थक आणि अंजली दमानिया यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू आहे. याच मुद्यावरून एकनाथ खडसे यांनी आज (रविवारी) जळगावात अंजली दमानिया यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. खडसेंच्या आरोपांना लागलीच प्रत्युत्तर देत एका व्हिडिओच्या माध्यमातून दमानियांनी आपली बाजू मांडली आहे.
दमानिया पुढे म्हणाल्या, खडसेंविरोधात माझी लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. त्याठिकाणी मी 1100 पानांची याचिका दाखल केली आहे. त्यात खडसेंच्या विरोधातील सारे पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. त्यामुळे दमानिया न्यायालयात पुरावे सादर करू शकल्या नाहीत. त्या पळ काढत आहेत, हे आरोप हास्यास्पद आहेत. एवढेच नाही तर पुण्याला जो 'सी समरी रिपोर्ट' दाखल करण्यात आला होता, त्याला आव्हान देणारी प्रोटेस्ट पिटीशन दाखल केली होती. त्यावर आता 4 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. खडसेंविरोधात माझा लढा सुरू असल्याने मला छळण्यासाठी त्यांच्यासह समर्थकांनी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याविरुद्ध दावे दाखल केले आहेत, असे दमानिया म्हणाल्या.
हेही वाचा - तारापूर औद्योगिक वसाहत दुर्घटना: पालकमंत्र्यांनी एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
'एसीबी'ची केस 'ओपन अँड शट' -
खडसेंविरोधात मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेली केस तर 'ओपन अँड शट' अशी आहे. त्यात ज्या कंपन्या अस्तित्त्वातच नाहीत, अशा कंपन्यांमधून त्यांच्या खात्यात पैसे कसे आले? त्या पैशांतून त्यांनी भोसरीची जमीन खरेदी केली. याचे सर्व पुरावे मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेल्या याचिकेत दिले आहेत, असा दावा देखील दमानियांनी केला आहे.
हेही वाचा - तारापूर एमआयडीसी स्फोट: राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
खडसे खोटं बोलताहेत -
जळगाव न्यायालयात जो दावा दाखल करण्यात आला आहे तो अशोक लाडवंजारी नामक व्यक्तीने दाखल केला आहे, असे खडसे सांगत आहेत.मात्र, खडसे खोटे बोलत आहेत. तो खोटा दावा स्वतः खडसेंनी केला आहे. त्यावर 23 जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीला मी जातीने हजर राहणार आहे आणि माझी बाजू मुद्देसूदपणे मांडणार आहे, असेही दमानया यांनी सांगितले.