उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे मत प्रक्रिया पार पाडण्यात आली. मात्र, या झालेल्या निवडणुकीत मतांमध्ये तफावत झाल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाने केला आहे. म्हणून या दोन्ही पक्षांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून आंदोलन करण्यात आले.
दोन्ही संघटनांमधील वाद असा आला समोर...
वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ या दोन्ही संघटना अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या आहेत. उस्मानाबादमध्ये या दोन्ही संघटनेचे दोन वेगळे जिल्हाध्यक्ष आहेत. या दोन्ही संघटनांकडून आज घंटानाद आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी दोन्ही संघटनांमध्ये धुसफूस पाहावयास मिळाली.
वंचित बहुजन आघाडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे घंटा नाद करत रॅली काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. तर भारिप बहुजन महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून घंटानाद आंदोलन केले. या दोन्ही संघटनेचा उद्देश ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात यावी, हाच होता. मात्र, या दोघांतील असलेला वाद हा 'मंजिल एक लेकिन रास्ते अलग' अशा दिसून आला.