उस्मानाबाद - जागजी येथे अवैध हातभट्टी दारूच्या नऊ भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच अन्य सात जणांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जागजी येथे अवैध दारूच्या हातभट्ट्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या विषयाची गंभीर दखल घेत पोलिसांचा मोठा ताफा आज (दि.29नोव्हेंबर)ला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लमाण तांडा येथे दाखल झाला. यामध्ये अवैधरित्या गावठी दारू काढत असलेल्या नऊ भट्ट्या पोलिसांनी नष्ट केल्या. संबंधित कारवाईत या भट्ट्या चालवणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, अन्य सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत बॅरेल, मोटार व हवा मारण्यासाठी भाते तसेच गूळ मिश्रित रसायन जप्त करून नष्ट करण्यात आल्याची माहिती उप-विभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी दिली.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्री करण्याऱ्यांचे धाबे दणाणले. या कारवाईत एकूण 64 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच कलम 65 (फ) 6683 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे पोलीस नाईक प्रताप बांगर यांच्या तक्रारीवरून भाऊ बाबू जाधव, ग्यानदेव देविदास जाधव व इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.