उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुका महसूल विभागाचा अनागोंदी प्रकार समोर आला आहे. कळंब तालुक्यातील मस्सा या गावच्या जेमतेम जिरायत शेती असणाऱ्या शेतकऱ्याच्या सात बाऱ्यावर चक्क 40 कोटी रुपयांचा बोजा चढवल्याचे समोर आले आहे. गौण खनिजाचे उत्खनन केल्याचा ठपका ठेवत कळंब तहसीलदाराने जोतिराम वरपे या शेतकर्याच्या सातबारावर 40 कोटीचा बोजा चढवला आहे. प्रत्यक्षात मात्र या शेतकऱ्यांच्या शेतातून गौण खनिजाचा एक दगड देखील उत्खनन केला गेला नाही .त्यामुळे गौण खनिजाचे उत्खनन न करतात या शेतकऱ्याच्या सातबाऱ्या वर 40 कोटीचा बोजा पडल्याने संबंधित शेतकऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रस्त्याचे काम करणाऱ्या मेघा कंपनीने केले परवानगी पेक्षा जास्त उत्खनन -
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शेगाव ते पंढरपूर हा महत्वकांक्षी प्रकल्प कळंब तालुक्यातून जातो. मेघा कंस्ट्रक्शन ही कंपनी या रस्त्याचे काम करते. या कामासाठी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. या कंपनीने उत्खनन केलेल्या गौण खनिजाची शासनाकडे रॉयल्टी भरली नाही. हे लक्षात आल्यावर कळंब तहसील ने यासंदर्भात 40 कोटीचा दंड ठोठावला. मात्र या दंडाचा बोजा शेतकऱ्याच्या सात-बारावर चढवला आहे. कहर म्हणजे कळंब तालुक्यातील मस्सा येथील शेतकरी जोतिराम वरपे यांच्या शेतीच्या सातबारा वर हा बोजा पडला गेला. प्रत्यक्षात मात्र वरपे यांच्या शेतात कोणतही गौण खनिजाचे उत्खनन झालंच नाही. कळंब तहसीलच्या या सुलतानी कारभारामुळे हा शेतकरी पुरता संकटात सापडला आहे.
40 कोटींचा बोजा पाहून शेतकऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली -
वरपे हे शेतकरी आपल्या शेतात ठिबक सिंचनाची योजना राबवण्यासाठी तहसील ऑफिस मध्ये गेले. त्यावेळी त्यांच्या सातबाऱ्यावर 40 कोटीचा बोजा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. उत्खनन न करताच सातबाऱ्यावर 40 कोटींचा बोजा असल्याचे ऐकून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हा बोज्या तात्काळ कमी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी वरपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तत्कालीन तहसीलदारांनी मेगा इंजिनिअरिंग कंपनीने विविध गटात मंजुरी पेक्षा जास्त करून खनिज उत्खनन केल्याप्रकरणी दंडाच्या नोटिसा काढल्या होत्या. त्या अनुषंगाने दिलेल्या नोटीस वर पुढील कारवाई करत मेगा इंजिनिअरिंगने उत्खनन केलेल्या सर्व्हे नंबरवर बोजा चढवला आहे, असं याबाबत कळंब तहसीलदार विद्या शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. तर या प्रकरणात त्रुटी असल्याचे मान्य करत हे प्रकरण फेर चौकशीसाठी देण्यात येईल असे उप विभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी सांगितले.