उस्मानाबाद - एकीकडे गावातील जिल्हापरिषद शाळा विद्यार्थ्यांआभावी बंद पडण्याचा मार्गावर आहे. पालक मराठी शाळांकडे नाक मुरडत आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत चांगले आणि आधुनिक शिक्षण मिळते म्हणून इंग्रजी शाळेत टाकत आहेत. मात्र, दुसरीकडे एका ध्येयवेड्या शिक्षकाने आपली जिल्हापरिषदची मराठी शाळा आधुनिक करण्याचा वसा घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील देऊळगाव या छोट्याशा गावात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची आधुनिक मराठी शाळा उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे ही जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. ही सव्वाशे कोटींची मराठी शाळा उभारण्याचा विडा एका अवलिया शिक्षकाने उचलला आहे. सचिन सूर्यवंशी असे या शिक्षकाचे नाव आहे. ते या शाळेचे मुख्याध्यापकदेखील आहेत. सूर्यवंशी यांनी या शाळेच्या उभारणीसाठी स्वतःची तीन एकर जमीन विकली आहे. तसेच या शाळेसाठी ते आपल्या पगारातून या दरमहा अकरा हजारांची देणगी देत आहेत.
शाळेसाठी स्वतःची तीन एकर जमीन विकली -
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील देऊळगाव 1993च्या भूकंपात उद्ध्वस्त झाले होते. शिक्षणासाठी गावात एकच जिल्हा परिषदेची शाळा, तीही मोडकळीस आलेली. अशा परिस्थितीत गावचे सुपुत्र सचिन सूर्यवंशी हे या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी शाळेची अवस्था बघून ही शाळा सुधारण्याचे ठरवले. कुणाच्याही मदतीची वाट न पाहता ते कामालाही लागले आणि त्यांनी शाळेच्या उभारणीसाठी स्वतःची तीन एकर जमीन विकली. हे पैसे त्यांनी शाळेच्या खात्यावर जमा ही केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर सूर्यवंशी यांनी स्वतःच्या पगारातील अकरा हजार रुपये दर महिन्याला शाळेसाठी देतात.
लोकांना मदतीची हाक -
सचिन सूर्यवंशी यांना गावात सव्वाशे कोटी रुपयांची जिल्हा परिषदेची शाळा उभी करायची आहे. मात्र, यासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकून जमा केलेली रक्कम तुटपुंजी पडते आहे. शाळेच्या उभारणीसाठी त्यांनी एक नवीन संकल्पना मांडली आहे. लोकांना त्यांनी मदतीची हाक दिली आहे. यामध्ये देशातील प्रत्येकाने या शाळेसाठी एक रुपयाची मदत केली, तर सव्वाशे कोटी रुपये जमा होतील. या पैश्यातून त्यांच्या आधुनिक मराठी शाळेचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांना वाटते.
सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन -
समाजातील जेष्ठ समाजसेवक, शिक्षक आणि गावकरी या कामासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. सचिन सूर्यवंशी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आनंदीबेन यांची भेट घेऊन त्यांना ही संकल्पना सांगितली. आनंदीबेन यांनीही सचिन सूर्यवंशी यांना शुभेच्छा देत या कामात बरोबर असल्याचे आश्वासन दिले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, हिवरे गावचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनीही सचिन सूर्यवंशी यांच्या या संकल्पनेला शुभेच्छा देत लोकांनी सचिन सूर्यवंशी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
गरज आहे ती तुमच्या छोट्याशा मदतीची -
सार्वजनिक उत्सवासाठी समाजातून स्वइच्छेने भरभरून वर्गणी गोळा होते. मंदिरातील दानपेटीतही दररोज करोडो रुपयांचे दान पडते. अशा परिस्थितीत प्रत्येकाने जर एक रुपया दिला तर सूर्यवंशी यांच्या स्वप्नातील आधुनिक ज्ञान मंदिर सहज उभे राहू शकते. ग्रामीण भागातदेखील आधुनिक आणि उच्चस्तरीय शिक्षण मिळू शकणारी शाळा उभी राहील, ज्यात गरिबांची मुले चांगले शिक्षण मोफत घेऊ शकतील. फक्त गरज आहे ती तुमच्या छोट्याशा मदतीची.
हेही वाचा - NAVNEET RANA VIDEO : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा चर्चेत; कारण काय?