उस्मानाबाद - वाशी पोलीस ठाण्यातील हनुमंत भागवत काकडे हा लाचखोर हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. हनुमंत काकडे हा तक्रारदार यांच्याकडे गुटखा विक्रीसंदर्भात लाचेची मागणी करत होता. त्यानंतर तक्रारदाराने काकडे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
पोलीस ठाणे वाशी या क्षेत्रात गुटख्याची अवैध विक्री करायची असेल तर हफ्ता द्यावा लागेल, अशी मागणी करण्यात आली असल्याचे तक्रारदराने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. तडजोडीनंतर ३ हजार रुपयांची लाचेची रक्कम ठरली. पारगाव येथील प्रसाद हॉटेलमध्ये लाच स्विकारताना काकडे यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत डॉ. श्रीकांत परोपकारी, बी. व्ही गावडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. पुढील तपास बी. जी. आघाव हे करत आहेत.