उस्मानाबाद - राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वांत जास्त भाव खाऊन गेले. त्यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा निवडणुकीतील 'आयकॉनिक मुमेंट' म्हणून कायम जनतेच्या लक्षात राहील. ज्याप्रमाणे राजकारणात पवार काहीही करू शकतात. त्याचप्रमाणे पवारांच्या एका चाहत्याने पवारांच्या वाढदिवसानिमित्त एक उल्लेखनीय कार्य केले आहे.
नुकताच शरद पवार यांनी आपला 79 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या. उस्मानाबादच्या निपाणी येथील कलाकार शेतकऱ्याने आपल्या साडेचार एकर शेतात हिरव्यागार पिकाच्या माध्यमातून पवारांची भव्य प्रतिकृती साकारली आहे. मंगेश निपाणीकर असे या कलाकार शेतकऱ्याचे नाव आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याचे छायाचित्र शेअर केले आहे.
हेही वाचा - ...अन् घाटावरच्या पायऱ्यावरच घसरला पंतप्रधान मोदींचा पाय; पाहा व्हिडिओ
शरद पवारांची ही 'ग्रास पेंटींग' करण्यासाठी साडेचार एकर जमिनीवर पंधरा दिवसांपूर्वी बियांची पेरणी करण्यात आली. यासाठी मंगेश यांनी 600 किलो बियांचा वापर केला. यात अळीव, मेथी, गहू, ज्वारी, हरभरा बियांचा समावेश आहे. वयाची ८० वर्षे गाठली तरी पवारांचा उत्साह आणि काम करण्याची इच्छा तरुणांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या वाढदिवशी या 'ग्रास पेंटींग'च्या माध्यमातून मी शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या नेत्याला शुभेच्छा दिल्या, असे मंगेश यांनी सांगितले.
हेही वाचा - 'माती विना शेती'; टेरेसवर फुलवली पाण्यावर शेती
निपाणीकर यांनी साडेचार एकर शेतात तब्बल 1 लाख 80 हजार स्क्वेअर फुटाची शरद पवार यांची प्रतिमा तयार केली आहे. यासाठी त्यांनी 600 किलो बियांचा वापर केला असून यात 200 किलो अळीव, 300 किलो मेथी, 40 किलो गहू, 40 किलो ज्वारी व 20 किलो हरभऱ्याचा वापर केला आहे.
ही प्रतिमा बनवण्यासाठी गावकरी व तरुण गेल्या 15 दिवसांपासून परिश्रम घेत होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही पूर्ण प्रतिमा तयार करण्यात आली होती. आकाशामधून पाहिले तर हुबेहूब शरद पवार या चित्रात दिसत आहेत.