उस्मानाबाद - शेतीमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेती तोट्यात जात आहे. दारूविक्रीतून अर्थकारण मजबूत होत असेल, तर गांजा लागवडीतून शेतकऱ्यांचे अर्थकारण बळकट होईल. यासाठी शेतकऱ्यांना गांजा लागवडीची परवानगी द्यावी, अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील एका तरुण शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली आहे.
गणेश गायकवाड, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. उत्तराखंड सरकारने २०१५ साली गांजाची लागवड कायदेशीर करण्याचा निर्णय घेतला. गांजा हा काही केवळ नशा करण्यासाठीच वापरला जातो, असे नाही. तो औषधासाठीही वापरतात. उत्तराखंड सरकारने गांजा लावायला परवानगी दिली आहे. सध्या कोरोनामुळे सगळे जग थांबले आहे. मात्र, शेतकरी रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून शेती पिकवत आहे. मात्र, शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. दारूविक्रीतून देशाची, राज्याची आर्थिक स्थिती सुधारत असेल, तर गांजा पिकवल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. त्याचबरोबर शासनाला महसूल देखील मिळेल, अशी लेखी मागणी या शेतकऱ्याने केली आहे. गांजाची चोरटी शेती होणार नाही. तसेच यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल, असेही निवेदनात म्हटले आहे. शासनाना गांज्याला परवानगी दिली, तर माझ्यासह सर्व शेतकरी बांधवांची अर्थव्यवस्था सुधारेल व आत्महत्या थांबतील, असा दावाही गणेश गायकवाड यांनी केला आहे.