उस्मानाबाद - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता व्यापाऱ्यांच्या दारातही फसवणुकींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनला मनमानीपणे आर्द्रता दाखवून भाव पाडला जात आहे. आर्द्रता मोजणी (मॉईश्चर मिटर) प्रमाणीकरण करण्याची जबाबादारी कोणत्याच शासकीय यंत्रणेकडे नाही. या मिटरची तपासणी किंवा खात्रीपूर्वक योग्यते संदर्भात कोणत्याही विभागाला माहिती नाही.
सर्वच प्रमुख विभागांनी आर्द्रता गणकाच्या प्रमाणीकरणासंदर्भात हात वर केले आहेत. यासंदर्भात जिल्हा मार्केटींग विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती, वैध वजन मापे शास्त्र विभाग, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी केली असता, कोणालाही यासंदर्भात उत्तर देता आले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या उपकरणाबाबत शासकीय उदासिनता असल्याचे दिसून येत आहे.
कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे व्यापारीही बिनधास्तपणे गणक वापरत आहेत. सोयाबीनला चांगला दर मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, जिल्ह्यात सर्वत्रच व्यापाऱ्यांकडून ‘आर्द्रता ’ असण्याच्या नावाखाली लूट सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. सोयाबीनमध्ये किती आर्द्रता आहे, याची तपासणी करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे आर्द्रता गणक आहे. यामध्ये सोयाबीन टाकून मोजणी केली जाते. मात्र, काही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे वेगवेगळी आर्द्रतेची नोंद झाली. अनेक व्यापारी अगदी जुने झालेले व सर्व्हिसींग न केलेले मिटर वापरत आहेत. यामुळे मनमानीपणे आर्द्रता (हवा) दाखवून दर पाडण्यात येत आहे. असे गणक तपासण्याची किंवा प्रमाणीत करण्याची कोणतीही यंत्रणाच अस्तित्वात नाही अगोदरच निसर्गाच्या फटक्याने नुकसानग्रस्त असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता प्रशासनाची उदासिनता व व्यापाऱ्यांच्या लबाडीचाही दणका सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासन कधी लक्ष देणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.