उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वारंवार पडणारा दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही घटना काल घडली. सर्जेराव मारुती काटे, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
काटे यांची खुदावाडी शिवारात शेती आहे. अतिृष्टीमुळे काटे यांच्या शेतीतील सर्व पीक वाहून गेले होत. तत्पूर्वी पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकटही त्यांच्यावर ओढावले होते. त्यामुळे, सर्जेराव यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी आणि दोन मुली आहेत.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका
मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोसावा लागला. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. तसेच, हाता-तोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिसकावून घेतल्याने यंदाचा दिवाळी सण साजरा करता आला नाही. त्यामुळे, शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.
या वर्षी 100 शेतकऱ्यांनी घेतला गळफास
अतिवृष्टीने झालेली नुकसान भरपाई लवकरात लवकर आणि भरघोस देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही कित्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. याच विवंचनेत शेतकरी आपले जीवन संपवू लागले आहेत. या वर्षी 100 शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे.
हेही वाचा - उस्मानाबादेत कोरोनाबधित शिक्षकांची संख्या वाढली; शाळा सुरू होण्या पूर्वीच धोक्याची घंटा