उस्मानाबाद : मराठा आरक्षणाच्या लढ्याला ( Maratha reservation fight ) पुन्हा एकदा मराठवाड्याच्या भूमीतून सुरुवात झाली आहे. कळंब शहरात दि.१९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य महामोर्चा काढण्यात आला. ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी लाखो मराठा बांधव व भगिनी या महामोर्चामध्ये सहभागी झाले.
मराठा समाजाचा हक्काच्या आरक्षणासाठी लढा : कळंब शहरातील विद्या भवन हायस्कूलचे मैदान ते उपविभागीय अधिकारी कार्यालय असा मोर्चाने प्रवास केला. आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी झुलवत ठेवले. मराठा समाजाचा हक्काच्या आरक्षणासाठी लढा सुरूच आहे. ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.
घोषणांनी परीसर दुमदुमला : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करुन त्यातून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणे, राज्यातील सर्व मराठा मुलामुलींची वसतीगृहे सुरु करण्यात यावीत यासह विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्वच भागातील मराठा समाज बांधव व भगीनी मोठ्या संख्येने सकाळपासूनच कळंब शहरात दाखल झाले. यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परीसर दुमदुमून गेला.
मोठ्या संख्येने सहभाग : या महामोर्चात सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवती, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ( large number of Maratha community )
प्रशासनाने केल्या खबरदारीच्या उपाययोजना : मराठा आरक्षण क्रांती महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जागोजागी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून, मोर्चातील नागरिकांसाठी अनेक सामाजीक संस्थांनी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची सोय केली आहे.