उस्मानाबाद - जिल्ह्यात सध्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, यापूर्वीही उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलन झाले असल्याचे काही अभ्यासक सांगतात. तेराव्या शतकात संत गोरोबाकाका यांनी भारतात पहिल्यांदाच साहित्य संमेलन भरवले होते. हे संमेलन जिल्ह्यातील तेर येथे पार पडले असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
संत गोरोबाकाका हे जिल्ह्यातील तेर येथील होते. तेर या गावचा इतिहास रोमन साम्राज्य व हडप्पा संस्कृती यांच्याशी जोडला जातो. इसवी सनाच्या तेराव्या शतकात आपला भारतीय समाज हा अंधश्रद्धेकडे झुकला होता. त्यामुळे या कालावधीत समाज प्रबोधन व्हावे म्हणून द्वीप प्रज्वलित करण्यासाठी सर्व संतमंडळी हे एकत्र आले. या संतांनी संपूर्ण भारतभर फिरून प्रबोधन केले. यावेळी गोरोबाकाका यांच्या समकालीन असलेले संत ज्ञानदेव महाराज, संत नामदेव महाराज, संत सावता महाराज, संत चोखोबा महाराज यांच्यासह इतर अनेक संत गोरोबाकाका यांच्या घरी तेर येथे एकत्र आले. या सर्वांनी गोरोबाकाका यांच्या घरी विचार मंथन केले विचारांची देवाणघेवाण करत हा संतांचा मेळावा आयोजित केला. समाजाच्या मनामध्ये बोध जागृत व्हावा. समाज चांगल्या दिशेने जावा यासाठी प्रवचन, कीर्तन, अभंग सादर केले आणि यातून लोकांचे प्रबोधन केले. यामुळेच विचारांचे आदान-प्रदान म्हणजेच संमेलन असेही म्हटले जाते आणि हेच भारतातील पहिले संमेलन असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे पुन्हा एकदा साहित्याचा उत्सव उस्मानाबादमध्ये होत असून हे संमेलन उस्मानाबादमध्ये पहिल्यांदाच नव्हे तर यापूर्वीही असे संमेलन झाले असल्याचे तेर येथील रहिवासी व अभ्यासक दीपक खरात हे सांगतात.
हेही वाचा - अचालबेट येथून निघाली मराठी साहित्याची ज्योत, आज पोहोचणार उस्मानाबादला
संत गोरोबाकाका हे कवी होते. त्यांनी वेगवेगळे अभंग रचले असून जवळपास 700 वर्षे या कालखंडाला पूर्ण झाले आहेत. गोरोबाकाका यांनी लिहिलेले अभंग आजही म्हटले जातात संत गोरोबाकाका यांनी भरवलेल्या साहित्य संमेलनाला विविध अनेक संतानसह तेरवासीय एकत्र आले होते. त्याप्रमाणेच आता होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबादकर एकवटले आहेत.
हेही वाचा - 'महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात कोसळणार'