धाराशिव Dharashiv Death News : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूंच्या घटना ताज्या असतानाच आता आरोग्य मंत्र्यांच्या मतदार संघातील भूम येथील ग्रामीण रुग्णालयात एका 14 महिन्याच्या मुलीला ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं या मुलीला खासगी दवाखान्यातून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यामुळं राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मतदार संघातच आरोग्यसेवेचे तीनतेरा वाजल्याचं या घटनेमुळं समोर आलंय. संबंधित अधिकांऱ्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी दिलं आहे.
ऑक्सिजन मशीनच नादुरुस्त : भूम तालुक्यातील शेकापूर येथील सद्दाम पठाण यांच्या अवघ्या 14 महिन्यांच्या मुलीला श्वास घेण्याचा त्रास होत होता. म्हणून त्यांनी तिला भूम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतू, या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था नसल्यानं भूमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, याठिकाणी डॉक्टरच उपस्थित नव्हते, त्यामुळं या मुलीवर परिचरिकेनं उपचार सुरू करुन ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला. पण ऑक्सिजन मशीनच नादुरुस्त असल्यानं मुलीला ऑक्सिजन मिळू शकला नाही, म्हणून मुलीचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
घटनेनंतर नागरिक आक्रमक : यानंतर भूम शहरातील काही नागरिकांसह मुलीच्या नातेवाईकांनी भूम ग्रामीण रुग्णालयाला धारेवर धरुन बालकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेऊन ठेवला. याची माहिती भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईक आणि नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर दीड तासानंतर अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोसावी याठिकाणी आल्यावर संतप्त नातेवाईकांनी त्यांच्यासमोर निष्काळजीपणा केलेल्या डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. त्यामुळं संबंधित डॉक्टरवर चौकशी करुन कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. परंतू, नातेवाईक ऐकत नसल्यानं शेवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन नातेवाईकांची सजूत काढली. संबंधित अधिकांऱ्यावर चौकशी समिती नेमून कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
हेही वाचा :
- Nanded Hospital Death Case : मोठी बातमी! नांदेड मृत्यूप्रकरणात अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; रुग्णालयातील मृतांची संख्या 41 वर
- Nanded Hospital Death Case : नवजात बाळासह आता आईनंही सोडला श्वास; नातेवाईकांचा आक्रोश
- Nanded Hospital Death Case : 'सरकारच व्हेंटिलेटरवर, रुग्णालयात साधी तापाची गोळी मिळेना'