उस्मानाबाद - कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळते आहे. देशभरासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या हातातलं काम सुटलं तर काही लोक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. हातातले काम नसल्याने रोजंदारीतून मिळणारा पैसाही मिळणे बंद झाले आहे
उस्मानाबाद शहरातील अशीच एका कुटुंबाची एक घटना पुढे आली आहे. 'किराणा संपलाय हो, आम्ही उपाशी आहोत, आम्हालाही धान्य द्या, माझ्या आईने देवा घरी जाण्यापूर्वी किराणा भरला होता मात्र गेल्या महिन्यात आई गेली त्यावेळेपासून आहेत या किराणावरतीच आमची भूक भागवत आहोत. मात्र, आता घरातील सगळं संपलं असून आम्हालाही मदत करा', अशी आर्त हाक हतबल कुटुंबातील बहिण भावाने दिली आहे. त्यांनी फोन करुन आपल्या भागातील एका नगरसवेकाला सांगितले.
आता आई या जगात नाही हो, आम्ही दोघेच घरात आहोत आणि घरात कोणी काम करणार नाही. आम्ही उपाशी आहोत. नगरसेवक युवराज नळे यांना हृदय पिळवटणारा एक कॉल आला. तो कॉल होता हतबल विकलांग मुलीचा. एका महिन्यापूर्वी घरात करती असलेली आई अचानक गेली आणि भाऊ बहिणीवर उपासमारीची वेळ आली.
कुटुंबात दोघेच आहेत, मुलगा विकलांग आहे आणि मुलगी पण काहीशी विकलांग आहे. या कॉलनंतर युवराज नळे यांनी त्यांच्या घरातील किराणा सामान देऊन तात्पुरता प्रश्न मिटवला आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.