उस्मानाबाद - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 11 हजारांच्या जवळ गेली आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा याबाबतीत गंभीर नसल्याचे दिसत आहे. कारण जिल्हा रुग्णालयात दाखल असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क तेथून पळून थेट बाजारात पोहचला. तरीही, जिल्हा रुग्णालयातील कोणालाही थांगपत्ता लागला नाही. अखेर पोलिसांनीच या रुग्णांचा शोध घेऊन त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल केले.
जिल्हा रुग्णालयात वारंवार अशा घटना पाहायला मिळत आहेत. यापूर्वीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयातून पळून गेले असल्याची घटना घडली होती. असे असताना आरोग्य यंत्रणा अद्यापही सुस्त आहे. त्यातच मृत्यूदरही वाढला आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावर जिल्हा कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी आहे, ते रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. सेनापतीलाच कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा अजूनही खिळखिळी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यावर अविश्वास दाखवत या 'सेनापतीं'नी खासगी रुग्णालयातच उपचार घेणे पसंत केले आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्याची जबाबदारी पेलण्यास सक्षम यंत्रणा नसल्याची परिस्थिती आहे.
हेही वाचा - केळी पीकविम्याचे जाचक निकष बदलावे; एकनाथ खडसे यांची राज्य सरकारकडे मागणी