उस्मानाबाद - देवळालीतील अक्षय देवकर या विद्यार्थ्याने अकरावीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की, नाही या चिंतेतून चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या देवकर कुटुंबास आज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी भेट घेत आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई-वडिलांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला. आरक्षण गेले खड्ड्यात असे ट्विट छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले होते.
यावेळी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, मी मनापासून थक्क झालो आहे, बोलण्यासारखे शब्दच उरले नाही. गरिबीतून अक्षयच्या आईने त्याला शिकवले तो नेहमी सांगायचा मराठा समाजात जन्म झाला ते चुकले परंतु, हे बरोबर नाही. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले, मराठा समाजाचाही या आरक्षणामध्ये समावेश होता. आज सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे. देवकर कुटुंबाच्या भावना तीव्र दुःखी आहेत, मी आरक्षण गेलं खड्ड्यात, असं बोललो मात्र, मी आरक्षणाच्या विरोधात नाही. कारण माझ्या आजोबांनी आरक्षण दिले आहे. मात्र, शाहू महाराजांना अपेक्षित असलेल आरक्षण आपण देतोय का? हा प्रश्न आहे. पूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावे आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोणीही जाऊ नये अशी विनंती मी इतर समाजाच्या लोकांना करत आहे.
बारावीपर्यंत शिक्षण गुणवत्तापूर्ण व मोफत देण्याची मागणी त्यांनी केली. मोफत शिक्षण असल्यामुळे आणि विद्यार्थी शाळा सोडून जात आहेत, हे थांबवले पाहिजे. तसेच हे जर थांबवायचे असेल तर मोफत शिक्षण हाच एकमेव पर्याय उरला आहे. रक्षणाबरोबरच सक्तीच्या शिक्षणाची गरज असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. खासगी संस्था चालक विद्यार्थ्यांची लूट करतात, त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोफत शिक्षणाबाबत आपण संसदेत आवाज उठवणार असून मुख्यमंत्र्यांशी या बाबतीत चर्चा करणार आहोत. छत्रपती घराण्यांनी आम्हाला डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत, असे शिकवले आहे. मात्र, देवकर कुटुंबाची परिस्थिती पाहिल्यानंतर मी भाऊक झालो आहे. गरीब परिस्थिती 94 टक्के गुण घेतलेला मुलगा आत्महत्या केल्यावर त्या कुटुंबाचे सांत्वन कोण करणार, या काळजीतून मी भाऊक झाल्याचे संभाजी महाराज यांनी सांगितले.
अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
राजेंनी आमच्या कुटुंबाची क्षमा मागितली व आरक्षणासंबंधित जो काही पाठपुरावा करावा लागेल, तो मी नक्की करीन मी तुमच्या दुःखात सहभागी आहे, असे म्हणत आमच्या समोरच पोलीस अधीक्षकांनाही योग्य तो जबाब नोंदवण्यासाठी फोन केला.