उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर समोरुन येणाऱ्या गाडीला चुकवत स्कॉर्पिओ गाडी पलटी झाली. तेव्हा गाडीने अचानक पेट घेतला. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून २ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अग्निशामक दल घटनास्थळी उशिरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी पोलिसांवर हल्ला चढवत अग्निशामक दलाची गाडी धक्का देऊन पलटी केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल जोमदे हा पुणे येथे राहतो. तो मामाला भेटण्यासाठी त्याच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बसून इतर तिघे जण उमरग्याहून तलमोड या गावी निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कराळी गावाजवळ समोरून वाहन आले. तेव्हा अपघात होऊ नये यासाठी अमोलने अचानक ब्रेक लावल्याने गाडी पलटी झाली. पलटी झालेल्या गाडीने अचानक पेट घेतला.
यात अमोल जोमदे (वय २३), ऋषीकेश मोरे (वय २२) या दोघांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर प्रदीप राजेंद्र मुगले (वय १९), संस्कार तळभोगे (वय १०) हे जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, संस्कार पाटील याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघात झाल्यानंतर पोलीस काही वेळात घटनास्थळी हजर झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. मात्र, अग्निशमन दलाची गाडी लवकर का येत नाही असा सवाल करत संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवला. त्यानंतर उशिरा आलेल्या अग्निशामक दलाच्या गाडीला नाल्यात ढकलून दिले. जमाव संतप्त झाल्याचे पाहून अधिकची पोलीस यंत्रणा मागवण्यात आली. तेव्हा जमावाला घटनास्थळापासून हटवण्यास पोलिसांना यश आले.