उस्मानाबाद - संचारबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि लॉकडाऊनचा नियम मोडून पुणे येथे दौरा करणारे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
अजिंक्य पवार हे शहरातील बँक कॉलनीमध्ये एकटेच भाड्याने राहतात. तर त्यांचा परिवार पुण्यात राहतो. त्यामुळे पवार फॅमिलीला भेटण्यासाठी 17 एप्रिल रोजी पुण्याला गेले व त्यानंतर 20 एप्रिल रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले. या दरम्यान देशभरात लॉकडाऊन होता. त्याचबरोबर जिल्हा बंदी घालण्यात आली होती. मात्र पवार यांनी हे सर्व नियम फाट्यावर मारत पुणे वारी केली.
विशेष म्हणजे पवार यांनी पुणे येथे जाण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नव्हती. त्याच बरोबर पुणे येथे जाण्यासाठी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर केला. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर पवार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली होती. त्यामुळे पवार यांना आता सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.