उस्मानाबाद - वाढीव वीजबिलाच्या विरोधात भाजप आक्रमक झाली असून, आज वीज बिलांची होळी करत भाजपने निषेध व्यक्त केला. शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी वीजबिलाची होळी करत राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मंदिर आंदोलनानंतर आता वीजबिलाच्या मुद्द्यावर भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपकडून आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. ग्राहकांना वीजबिलातून सूट मिळणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. याचा निषेध करण्यासाठी उस्मानाबादमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, दत्ता कुलकर्णी, राजसिंह राजेनिंबाळकर, सुधीर पाटील यांची उपस्थिती होती. या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विरोधी पक्षनेते दरेकर यांनीही केली होती टीका
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. वाढीव वीजबिल संदर्भात राज्य सरकारने युटर्न घेतल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच या मुद्द्यावरून ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केली होती.