उस्मानाबाद - शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्यावरील अविश्वास ठराव आज बहुमताने मंजूर करण्यात आला. 28 विरुद्ध 3 असा ठराव मांडत सुरज साळुंखे यांना उपनगराध्यक्ष या पदावरून खाली यावे लागले. साळुंखे हे राष्ट्रवादीच्या मदतीने उपनगराध्यक्ष झाले होते, आता त्यांना राष्ट्रवादीमुळेच या पदावरून दूर व्हावे लागले आहे.
हेही वाचा - छेड काढणार्या टवाळखोराला मुलींनी दिला चोप
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. मात्र, उस्मानाबाद नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी आहे. नगरपालिकेत एकूण 39 पैकी 18 राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, शिवसेनेचे 11, भाजपाचे 8, काँग्रेसचे 2, असे संख्याबळ आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे मकरंद राजेनिंबाळकर हे थेट जनतेतून निवडून आले होते. त्यानंतर जिल्ह्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेस यांची आघाडी असताना उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत सुरज साळुंखे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या मदतीने उपनगराध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली होती. मात्र, राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर येथील समीकरण बदलले आणि उपनगराध्यक्ष पदासाठी सुरज साळुंखे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. आज सर्वसाधारण सभा आयोजित करून हा अविश्वास ठराव मांडण्यात आला. यात 28 सदस्यांनी उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात मतदान केले तर 3 सदस्यांनी सुरज साळुंखे यांना पसंती दिली. यावेळी शिवसेनेच्या 4 सदस्यांनी सुरज साळुंखे यांच्याविरोधात मतदान केले आहे. शिवसेनेचे इतर नगरसेवक हे आज गैरहजर असल्याने त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.
हेही वाचा - निरर्थक मुद्दे सोडा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- राजू शेट्टी