उस्मानाबाद - औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या आढावा बैठकीसाठी आमदार बच्चू कडू उस्मानाबादमध्ये आले होते. यावेळी त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना भाजपावर टीका केली. वीज बिल प्रकरणी भाजपाने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. वीज बिलाची होळी करत भाजपने राज्य सरकारचा निषेध केला. त्यावर बच्चू कडू यांनी टीका केली आहे.
बच्चू कडूंची टीका
भाजपाच्या आंदोलनावरुन ते म्हणाले की, भाजपाला तेवढे तरी करु द्यावे लागेल त्यांच्याकडे आता दुसरे काय आहे. 75 टक्के लोकांनी वीज बिले भरली आहेत. तर उरलेल्या 25 टक्के लोकांसाठी भाजपा आंदोलन करते आहे. त्यातील भाजपाचे लोक किती हे पाहावे लागेल, असे म्हणत भाजपाच्या आंदोलनावर शंका उपस्थित केली. त्याचबरोबर जालन्यात रात्रीच्या वेळी शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्याबाबत बोलताना शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज सोडण्यासाठी मी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतामध्ये सिंगल फेस लाईट देण्याचे काम सुरू आहे जेणेकरून शेतकऱ्यांना रात्रीही शेतात काम करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही किंवा त्यांच्या जीवावर बेतेल असा प्रकार घडणार नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
हेही वाचा - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन
हेही वाचा - विहंग सरनाईक यांची पाच तास ईडीकडून चौकशी; मंगळवारी झाली छापेमारी