उस्मानाबाद - मराठवाड्यात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यास पाणी नसल्याने पसापसा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अत्यल्प पावसामुळे तब्बल 110 धरणं कोरडीठाक पडली आहेत. त्यावरुन दुष्काळ किती भयंकर आहे याची प्रचिती येते.
मागील आठ वर्षांपासून उस्मानाबादसह मराठवाड्यातील दुष्काळ मागे हटायचे नाव घेत नाही. जिल्ह्यातील तेरणा धरण बांधल्यापासून कधी नव्हे, ते या पाच वर्षात प्रत्येक उन्हाळ्यात कोरडा पडत आहे. यापूर्वी धरणाच्या परिसरातील लोकांना तेरणा धरणाचा पायथा कोरडा पडलेला कधी पाहायला नव्हता, मात्र आज घडीला यात शून्य टक्के पाणीसाठा आहे. तेरणा धरणासह जिल्ह्यातील 223 धरणे अशीच पाण्यावाचून मृत्यूची घटका मोजत आहेत. आज घडीला जिल्ह्यातील धरणांमध्ये 13.71 दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे फक्त 1.96 टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
जिल्ह्यात सीना-कोळेगाव हा मोठा प्रकल्प आहे. 17 धरणं मध्यम स्वरूपाची आहेत. तर 205 लघु प्रकल्प आहेत. या धरणांपैकी 110 धरणं अगदी कोरडीठाक पडली आहेत. तर 81 धरणांची पाणीपातळीही जोत्याच्या खाली आहे. मागील वर्षी याच दिवसांमध्ये 12.72 टक्के एवढा पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी पावसाचे प्रमाण घटले आणि धरणांनी लवकरच दम तोडल्याचे उघड झाले.