येवला (नाशिक)- सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोना वाढत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरी देखील काही नागरिक अजूनही मास्क घालताना दिसत नाही. नागरिकांनी मास्क घालावे, यासाठी येवल्यातील एका मास्क विक्रेत्याने अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने मास्कवर मास्क वापरणाऱ्या व्यक्तीचा फोटो छापण्यास सुरुवात केली आहे. तसेच हेच मास्क जर लग्नात वापरण्यात येणार असतील, तर त्या मास्कवर संबंधित वधू-वरांचे फोटो छापण्यात येतात. त्याने तयार केलेले हे मास्क येवलेकरांच्या पसंतीस उतर आहेत.
मास्कला नागरिकांची पसंती
मयूर येवले असे या तरुणाचे नाव आहे. आपण तयार केलेल्या मास्कबद्दल बोलताना मयुर म्हणाला की, नाशिक जिल्ह्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मास्कचा नियमीत वापर केल्यास आपण कोरोनाला आळा घालू शकतो. मात्र अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र नागरिकांनी मास्क घालावे यासाठी ही कल्पना मला सूचली. या मास्कवर आपला फोटो असल्याने, नागरिक हौशीने हे मास्क घालतात. तसेच आपण यावर वधू-वरांचा देखील फोटो छापत असल्याने या मास्कला लग्न समारंभात देखील मोठी मागणी आहे.
हेही वाचा - 'खेळ संपला, आता फक्त विकास होणार'; दीदींच्या 'खेला होबे' घोषणेला मोदींचे प्रत्युत्तर