नाशिक : रानमेवा व रानभाज्या हा निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्याची जपवणूक व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक रानवैभवाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाज्या प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना भुसे म्हणाले, आदिवासी शेतकरी बांधवांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने या शुभदिनी कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रमुख शहरांमध्ये हा रानभाज्या महोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांचे असेलेले महत्व अधोरेखित होणार आहे. रानभाज्या ही निसर्गाची देणगी असून कोणतेही रासायनिक खत किंवा मशागतीशिवाय त्या उगवतात. आज कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या रोगाशी सामना करण्यासाठी शरीरातील प्रतिकारक शक्ती वाढविणे व टिकविणे खूप गरजेचे आहे. या रानभाज्या प्रथिने, पोषणद्रव्य, व जीवनसत्वयुक्त असून इम्युनिटी बुस्टर म्हणून यांचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. त्यामुळे रानभाज्यांना एक व्यावसायिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले आहे.
लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या प्रतिकुल परिस्थितीतही शेतकरी राजाने अन्नधान्य, दूध व भाजीपाला यांचा पुरवठा कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण न करता केला आहे. संपूर्ण देशात बळीराजा या कार्यात कायमच अग्रेसर राहिला आहे. त्याचे हे योगदान खुप मोठे आहे. कृषी विभागाने या रानभाज्या महोत्सवाचे नियोजन अत्यंत कमी वेळात केले हे कौतुकास्पद आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेतून गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. यातून शेतकरी स्वत: आपल्या शेतमालाचे ब्रँडींग करू शकल्याने शेतीमालाला चांगला दर मिळेल. गट माध्यम व संस्था यांच्या माध्यमातून या रानभाज्यांच्या विक्रीसाठी शहरांमध्ये कायमस्वरुपी जागा उपलब्ध करून हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. या योजनेतून शेतीमालाला गोडाऊन, स्टोअरेज, कोल्ड स्टोअरेज देखील उपलब्ध करून दिले जाणार असल्याचेही कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणाले, कृषी विभागाला शेतकरी व समाज यांना जोडण्याची चांगली संधी कृषी विभागाने या महोत्सवाचे आयोजन करून दिली आहे. आदिवासी बांधवांच्या रानभाज्या जनतेपर्यंत पोहविण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आगामी काळात शहरातील कृषी विभाग व शासनाच्या उपलब्ध जागांमध्ये कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. आज या महोत्सवात जवळपास 367 रानभाज्यांचे प्रकार उपलब्ध आहेत, व हा ठेवा आपणास जपायचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात या रानभाज्यांच्या पाककृती युट्यूबसारख्या माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत असेही जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.