नाशिक : अनेक समाजात विधवा महिलेला परिवारात दय्यम स्थान दिले जाते. घरातील धार्मिक कार्यक्रमा पासुन अशा महिलांना कायमच दूर ठरवले जाते. मात्र, असे असुन देखील समाजाचे बंधन तोडून जैन समाजातील प्रीती पटणी यांनी आपल्या मुलीचे कन्यादान केले आहे.
समाज बंधने बाजूला ठेऊन कन्यादान : विधवा महिलाने याच रंगांची साडी घायलायची, तिने मेहंदी लावायची नाही, बांगड्या घालायच्या नाही, कुठल्याही धार्मिक शुभ कार्यात सहभागी व्हायचे नाही, अशी परंपरा आजही अनेक समाजा कायम आहे. एकीकडे भारत देश आधुनिकतेच्या वाटेवर असताना दुसरीकडे मात्र, देशात राहणाऱ्या अनेक समाजामध्ये अंधश्रद्धा, जुन्या रूढी परंपरा आजही कायम आहे. या सर्वांना फाटा देत विधवा असलेल्या प्रीती पाटणी यांनी आपल्या मुलगीच्या लग्नात तिच्या इच्छेसाठी समाज बंधने बाजूला ठेऊन कन्यादान केले आहे. यासाठी प्रीती यांना त्यांच्या परिवाराने देखील प्रोत्साहन दिले. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे समाजातील इतर विधवा महिलांना देखील ऊर्जा मिळाली आहे.
मुलीच्या इच्छे साठी समाजाबंधने मोडली : आमच्या जैन समाजात आजही विधवा महिलांना शुभ कार्यात दुय्यम स्थान दिले जाते. तिच्यावर अनेक बंधन असतात. माझ्या पतीचे सहा वर्षापूर्वी निधन झाले. दोन वर्षांनी सासऱ्यांचे सुद्धा निधन झाले. घरात करता पुरुष नसल्याने सर्व जबाबदारी माझ्यावर पडली. सदन कुटुंब असून सुद्धा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचा व्यवसाय मी संभाळला. अशात एक स्त्री व्यवसाय करते म्हणून अनेकांनी मला चुकीचे ठरवले. पण, मी जिद्दीने उभी राहिले.
मुलीच्या लग्नात पुढाकार : मुलींचे शिक्षण केले,अशात मुलगी प्रिया हिचे लग्न ठरले. मुलीने अट ठेवली की माझ्या लग्नात तू मेहंदी लावली तरच, मी मेहंदी लावेल. तू माझ्या लग्नाचे सर्व सोपस्कार पार पाडायचे, कन्यादान करायचे, यावर मी विचार केला. जर एखादी विधवा स्त्री आपल्या मुलांचे पालनपोषण करू शकते, तर ती स्त्री आपल्या शुभ कार्यात अशुभ कशी असू शकते?. म्हणून मी माझ्या मुलीच्या लग्नात पुढाकार घेत मेहंदी लावली. तिचे कन्यादान केले, तसेच सर्व धार्मिक विधीमध्ये स्वतः उभी राहिली. आज माझ्या या निर्णयामुळे इतरही समाजातील विधवा महिलांना ऊर्जा मिळाली आहे. याचा मला आनंद असल्याचे प्रीती पाटणी यांनी सांगितले.