नाशिक - चाळीसगाव येथील कुख्यात सराईत गुंड हैदर आली आसिफ अली सय्यद याचे मालेगावात जंगी स्वागत करण्यात आले असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच हैदरला मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सूटका मिळाली होती. दरम्यान हैदरच्या स्वागतासाठी मालेगाव शहरातील अनेक गुंडांची उपस्थिती होती. अलीशान कारमधून त्याची मिरवणूक देखील काढण्यात आली. दरम्यान त्याने एका हॉटेलमध्ये जेवण देखील केले, नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील हैदर आलीच्या जल्लोषाचा हा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.
पोलिसांकडून व्हिडिओची दखल
हैदर हा चाळीसगाव येथील असून, त्याच्यावर चाळीसगाव पोलीस ठाण्यात बारा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात आर्म ॲक्ट, गंभीर दुखापत, जीवे मारण्याचा प्रयत्न यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता चाळीसगाव पोलिसांनी त्याच्या हद्दपारीसाठी उपविभागीय दंडाधिकार्यांकडे देखील प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली असून, या व्हिडिओमध्ये असलेल्या लोकांचा शोध घेण्यात येत आहे.