नाशिक - घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, चेन स्नॅचिंग, अशा घटना मनमाड शहराला काही नवीन नाहीत. मात्र, काही दिवसांपासून मनमाड शहर आणि परिसरात पाण्याच्या चोरीची घटना घडली आहे. मागील दोन दिवसांत घरातील पाण्याच्या टाकीतून चक्क ३०० लिटर पाण्याची चोरी झाल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विलास आहेर, सामाजिक कार्यकर्ते (श्रीवस्ती नगर, मनमाड) यांच्या राहत्या घराच्या छतावरील ५०० लिटर पाण्याच्या टाकीतून सुमारे ३०० लिटर पाणी चोरीला गेले आहे. याबाबत आहेर यांनी शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी आहेर यांचा तक्रार अर्ज स्वीकारला नाही. त्यामुळे हे पाणी कोणी चोरले, याचे गूढ निर्माण झाले आहे.
मनमाडमध्ये सध्या महिन्यातून एक दिवस पाणीपुरवठा होतो. त्यामुळे घराच्या छतावर, घराच्या बाहेर ओट्यावर, तसेच घरात जिथे जागा मिळेल तिथे घरातील भांड्यात पाणी साठा केला जातो. तब्बल महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये करताना दिसून येते. पालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठ्याशिवाय मनमाडकरांना सध्या दुसरा कोणताच पर्याय नाही, अशा गंभीर परिस्थितीमध्ये साठवलेले पाणी चोरी घटना घडत आहेत.
पाणी चोरीची पोलिसांत तक्रार देण्यासाठी आहिरे गेले असताना त्यांना पाणी चोरीची तक्रार देऊ नका, पाहिजे तर तुमच्याकडे टँकर पाठवून देतो, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने पाणी चोरीचा पंचनामा करता येणार नाही. पाण्याला रंग, वास, किंमत ठरवता येत नाही, किती पाणी होते व कसे चोरीला गेले हे कसे ओळखायचे त्यासाठी साक्षीदार कोणाला घ्यायचे? असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले म्हणून पोलिसांनीदेखील याबाबत काढता पाय घेतला. त्यामुळे आता मनमाडकरांना घरातील मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्याबरोबरच साठवून ठेवलेल्या पाण्याचेदेखील रक्षण करावे लागणार आहे.