नाशिक - गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नुकतीच बांधण्यात आलेली पाण्याची टाकी कोसळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथे घडली. याघटनेत पाणी पुरवठा योजनेचे कर्मचारी बाळू सोनवणे थोडक्यात बचावले. 6 वर्षांपूर्वी बांधलेल्या या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही टाकी कोसळली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेली जिल्हा परिषद शाळेजवळील ही टाकी कोसळल्याने मोठा आवाज झाला होता. टाकी कोसळल्यानंतर गावातील असंख्य महिला आणि पुरुषांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
डांगसौंदाणे येथे सुमारे 43 लाख रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना 2 टप्प्यात राबवण्यात आली होती. त्यासाठी 27 लाख रुपये डांगसौदाणे गावासाठी तर उर्वरित रक्कम ही एकलव्य वस्तीच्या पाणी योजनेसाठी दिली होती. तत्कालीन पाणीपुरवठा सचिव व ग्रामपंचायत सदस्य कैलास बोरसे यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली. त्यानंतर ग्रामपंचायत सत्तापालट झाल्यावर ही योजना वादात सापडल्याने तत्कालीन सचिव व सत्ताधाऱ्यांमध्ये वाद झाला. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सिंधुताई सोनवणे यांनी या पाणी योजनेचा ताबा सत्ताधाऱ्यांना मिळावा, यासाठी जिल्हा परिषदसमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला. तरीही तत्कालीन सचिवांनी पाणीपुरवठा योजनेचे दप्तर ग्रामपंचायतीकडे देण्यास नकार दिल्याने ही पाणीपुरवठा योजना परिसरात मोठा चर्चेचा विषय ठरली होती.
त्यानंतर अपूर्ण असलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामस्थांकडून मागणीचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी परवानगी दिली. तेव्हा टाकीचे काम पूर्ण झाले. मात्र, 30 वर्षे आयुष्य असलेली पाण्याची टाकी 5 वर्षांतच पडल्याने ठेकेदारासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.