नाशिक - पालखेड धरणाच्या डाव्या कालव्यातून मनमाड, लासलगाव, येवला या तालुक्यातील ४० टंचाईग्रस्त गावांना आज (रविवार) पिण्याच्या पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या दरम्यान, कालव्याच्या मार्गामध्ये पाणीचोरी होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभाग, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांचे ठिकठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
मनमाड शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या तीस दिवसापासून गंभीर झाला असून आता या पाण्यामुळे मनमाडकरांची तहान भागणार आहे.
अवैध पाणी उपसा टाळण्यासाठी कालव्यावरील पाईप भुसुरुंगाद्वारे तोडण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. आर्वतन सोडल्यानंतर पालखेड डावा कालवा ज्या भागातून जातो त्या भागातील वीज २० तास बंद करण्याचा निर्णयही प्रशासनाने घेतला आहे.
मनमाड ,लासलगाव, येवला या तालुक्यातील चाळीस गावातील पाण्याचा प्रश्न बिकट असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे ४८० टीएमसीएफटी पाणी पालखेड धरणातून डाव्या कालव्याद्वारे आठ दिवस टप्प्याटप्प्याने सोडले जाणार आहे.
दरम्यान, पाण्याचा शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात अवैध उपसा पाईप टाकून केला जातो. यासाठी प्रशासनाने पालखेड धरणातून जिथून पाणी मनमाड ,येवला, लासलगाव गावांना जाते. त्या परिसरातील कालव्याची पाहणी करून चोख बंदोबस्त ठेवला आहे.