नाशिक - ज्या माणसाने आपल्या आयुष्यातील ५५ वर्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी खर्च केली. त्या मराठी मातीतल्या जाणता राजाला ईडीची भीती घालणाऱ्या सरकारची मस्ती मतदानातून उतरवा असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. येवला येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
येवला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपच्या अजगराने वाघ सुद्धा गिळला आहे आणि त्याचा मणका देखील मोडला आहे. मात्र, या अजगराने शरद पवारांसारख्या ७९ वर्षाच्या नेत्यावर फुत्कार केला, तेव्हा डोक्यात काठी पडली, असे डॉ. कोल्हे म्हणाले.
हेही वाचा - भाजपचे माजी आमदार संजय पवार यांचा पंकज भुजबळ यांना जाहीर पाठिंबा; महायुतीला धक्का
राफेलच्या खाली चिरडली जाणारी लिंब बघू नका. राफेलमुळे नाशिक जिल्ह्यातील तरुणांचा रोजगार चिरडला गेला याचा विचार करा. शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी चौसष्ठ पुरावे मागण्यात आले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे लोक मत मागायला येतील. तेव्हा तुम्हीही पुरावे सादर करा मग आम्ही विचार करू मत देण्याचा विचार करू असे सांगा. सरकारची मस्ती जिरवण्याची ताकद जनतेला मतदानाच्या अधिकारामुळे मिळाला आहे. मतदारांनी विचार करून मतदान करावे. कमळाच्या पाकळ्या झडल्या पाहिजेत आणि धनुष्याचा बाण मोडला पाहिजे, असे आवाहन डॉ. कोल्हेंनी मतदारांना केले.
या सभेला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मनसेच्यावतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा जाहीर केला. मनसेचे बालेश जाधव, नरसिंह दरेकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.