नाशिक - यंदाच्या आषाढी एकादशीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. इतक्या वर्षात पहिल्यांदा मोजक्या भाविकांच्या उपस्थित विठुरायाची महापूजा पार पडली. भाविकांना मंदिरा बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन विठ्ठल भेटीची भूक भागवावी लागली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रशासनाने नागरिकांसाठी नियम अधिक कडक केले आहेत. आजचा आषाढी एकादशीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यंदा इतिहासात पहिल्यांदाच आजच्या दिवशी भाविकांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागले. नाशिकच्या कॉलेज रोड भागातील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात यंदा मोजक्या भाविकांच्या उपस्थित सकाळी महापूजा पार पडली. यावेळी काही वेळासाठी भजन, कीर्तन, अभिषेक सोहळा पार पडला. मात्र, सामान्य भाविकांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. जगावर आलेले कोरोनाचे संटक लवकर टळू दे, असे साकडे भाविकांना विठ्ठलाला घातले.
दरवर्षी मंदिरात भाविकांची रांग -
नाशिकच्या कॉलेज रोड येथील विठ्ठल मंदिर हे जुने मंदिर आहे. या मंदिरावर अनेक भाविकांची श्रद्धा असून आषाढी एकादशीला या मंदिरात मोठा सोहळा होत असतो. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. आषाढी एकादशीला भजन सप्ताह पार पाडत असतो. सकाळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना अभिषेक घातला जातो. भजन, कीर्तन होत असते. सकाळी 6 वाजेपासून भाविक दर्शनासाठी रीघ लावत असतात. मात्र, यंदा भाविकांना मंदिरा बाहेरूनच कळसाचे दर्शन घेऊन विठ्ठल भेटीची भूक भागवावी लागली.