नाशिक - सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या व्हायरल इन्फेक्शन होणाऱ्या आजाराने त्रस्त नागरिकांनी सरकारी आणि खासगी रुग्णालये गर्दीने फुल्ल झाली आहेत. बदलत्या वातावरणाचा हा प्रकार असून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत.
हेही वाचा - श्वसननलिकेतून काढले 1 रूपयाचे नाणे, 9 वर्षीय 'पायल'ला मिळाले जीवदान
मनमाड शहरातील उपजिल्हा रुग्णालय व शहरातील असलेले खासगी रुग्णालयात साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभर उन्हाळ्यासारखे गरम तर, रात्री हिवाळ्यासारखी थंडी तर, कधी ढगाळ वातावरण यामुळे विविध साथीच्या रोगांची लागण होत आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये रोजच्या ओपीडीपेक्षा जास्त ओपीडी होत असून सर्वात जास्त सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण येत आहेत. मलेरिया आणि निमोनियाचे देखील रुग्ण आढळून येत आहेत. यावर काळजी घेणे हाच सध्या तरी उपाय असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. त्या बदलाचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो. कधी गरम कधी थंडी यामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार जडतात. याकडे दुर्लक्ष केल्यास निमोनिया होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, तसेच बाहेरच्या उघड्या अन्नाचे सेवन करणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. पालिकेच्यावतीने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.