नाशिक- युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे, शरद पवार हे युपीएचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पुढील वर्षी होणाऱ्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवारांच्या अनुभवाचा युपीएला फायदा होईल
दरम्यान पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्या देशात भाजपप्रणीत एनडीएसमोर कॉंग्रेसप्रणीत युपीए प्रमुख विरोधकाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे असे वाटते. असे अनेक पक्ष आहेत, की जे एनडीएमध्ये देखील नाहीत, आणि युपीएमध्ये देखील नाहीत. मात्र त्यांची भाजपविरोधात आघाडी उघडण्याची इच्छा आहे. अशा सर्व घटक पक्षांची एकत्र मोट बांधण्याचे काम केवळ पवार हेच करू शकतात. सोनिया गांधी यांनी देखील युपीएचे नेतृत्व खूप चांगल्या प्रकारे केले. मात्र आता त्या आजारी असतात, राजकारणात फारशा सक्रिय नसतात. सध्या भाजपविरोधात युपीएची ताकद कमी पडताना दिसत आहे. त्यामुळे जर युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी केले,तर त्याचा अनुभवाचा युपीएला निश्चितच फायदा होईल.
नाशिकमध्ये शिवसेनेचाच महापौर
नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवतील की नाही याबाबत अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. वेळ आल्यावर आम्ही ती करू. मात्र असं असलं तरी नाशिक महानगरपालिकेत महापौर शिवसेनेचाच होईल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट केली असून, ठिकठिकाणी पक्षच्या नवीन शाखा उघडण्यात येत असल्याचेही यावेळी राऊत म्हणाले.