नाशिक - 'कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये उद्यापासून (7 जून) सर्व दुकाने दिलेल्या वेळेत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, ही सूट म्हणजे धोका टळला असे नाही. नाशिककरांनी अटीशर्थींचे पालन करावे. अन्यथा तिसर्या लाटेला सामोरे जावे लागेल. अटीशर्थी निर्बंध नसून कोरोनापासून वाचण्यासाठी सुरक्षेची ढाल आहे. त्याचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे', असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.
दुसरी लाट गंभीर
'नाशिक जिल्ह्याचा तिसर्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून (7 जून) सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून पुन्हा सर्व व्यवहार पूर्ववत होणार आहेत. पण, नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मागील फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात 1000 अॅक्टिव्ह रुग्ण होते. त्यामुळे सर्वकाही अनलाॅक करण्यात आले. तज्ज्ञ दुसर्या लाटेचा धोका वर्तवत असताना आपण सर्व बेफिकरीने वागलो. सर्व सुरु करताना नियम व अटीशर्थीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी दुसरी लाट धडकली. 1000 अॅक्टिव्ह रुग्णसंख्या एक महिन्यात ४० हजारांवर पोहोचली आहे. या लाटेमुळे पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावावा लागला. मोठ्या प्रयत्नानंतर ही लाट ओसरली आहे. मात्र अद्याप धोका टळलेला नाही. सध्या ६ हजार ७४८ रुग्ण उपचार घेत आहेत. रोज कोरोनाने मृत्यू होणार्यांचे प्रमाण वाढत आहे. ते बघता अनलाॅक केले असले तरी नाशिककरांनी दिलेल्या अटीशर्थीचे काटेकोर पालन करावे', असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
सध्या ६ हजार ७४८ अॅक्टिव्ह रुग्ण
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (6 जून) प्राप्त झालेल्या अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ७६ हजार ८९६ कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ६ हजार ७४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये ४५० ने घट झाली आहे. आतापर्यंत ४ हजार ९१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
असे असतील निर्बंध
- आवश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार
- मॉल, चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स) नाट्यगृह बंद राहणार
- उपहारगृह ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी सुरू ठेवता येणार
- सार्वजनिक ठिकाण, पटांगण, वॉकिंग-सायकलिंग परिसर रोज सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत खुला राहणार
- खासगी कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार
- शासकिय व खासगी कार्यालयात उपस्थिती ५० टक्के
- क्रीडा : ऑऊट डोर सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत
- लग्न समारंभ - ५० लोकांना परवानगी
- अंत्यसंस्कार - २० लोक
- बांधकाम फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर किंवा मजुरांना ४ वाजेपर्यंत मुभा
- जिम, सलून, ब्यूटी पार्लर, वेलनेस केंद्रे ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार
- सार्वजनिक वाहतूक १०० टक्के सुरु राहणार, उभे राहून प्रवास करण्यास मनाई
- सर्व प्रकारची माल वाहतूक सुरु राहणार
- माल निर्यात करणाऱ्या कंपन्या पूर्णवेळ सुरु राहणार
- आवश्यक उत्पादन कंपन्या, निरंतन उत्पादन करणाऱ्या कंपन्या (ज्या उत्पादनगृहात उत्पादन लगेच थांबवणे शक्य नाही), राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी आवश्यक उत्पादने, डेटा केद्र, आयटी सेवा नियमित पूर्णवेळ सुरु राहणार.
हेही वाचा - सलून व्यवसायिकांनी वाटेतच अडवला राज्यमंत्री सुनील केदारांचा ताफा