नाशिक : लहान मुलाला होणाऱ्या मारहाणीपासून वाचवण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांवर टोळक्याने सशस्त्र हल्ला केला असून यात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री चुंचाळे शिवारातील संजीवनगरात घडली. चुंचाळे शिवारात गुंडांची दहशत वाढली आहे. दरम्यान या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोपींचा शोध सुरू : टोळक्याच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे मिराज खान आणि इब्राहिम खान, अशी आहेत. दोघांपैकी एकाचा उपचारापूर्वी आणि दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. गुरुवारी रात्री रुग्णालयाच्या परिसरात तणावाची स्थिती होती. दरम्यान रात्रीच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली असून संशयितांचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या.
काय आहे घटना : पोलिसांनी आणि प्रत्यक्षदर्शी इब्राहिम खान, रईस अली खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुंचाळे शिवारातील संजीवनगर येथे एका लहान मुलाला काही तरुण मारहाण करत होते. हा वाद सोडवण्यासाठी मिरज खान, इब्राहिम शेख गेले. याचा राग आल्याने काही तरुणांनी या दोघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर रिक्षामधून काही तरुण आले. त्यांनी या दोघांना घरातून बाहेर काढत त्यांच्यावर शस्त्राने हल्ला केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. मारेकरी तेथून गेल्यानंतर नातेवाईकांनी त्या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात तणाव : या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार मिळण्यास विलंब होत होता. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी या दोघांना थेट पोलीस आयुक्तालयात नेले आणि तेथे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी नातेवाईकांची समजूत काढून जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. परंतु उपचार सुरू होण्यापूर्वी एकाचा तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी वाढली होती. त्यामुळे पोलिसांनी रुग्णालयाच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा-