नाशिक- पिंपळगाव बसवंत येथील महामार्ग पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच घेतल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अँटी करप्शन ब्युरोच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. गाड्यांवर कुठलीही कारवाई करू नये यासाठी आठ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.
मालेगाव येथील एका ट्रान्सपोर्टच्या ३५ गाड्या नाशिक ते पिंपळगाव वाहतूक करतात. या गाड्यांवर कुठलीही कारवाई करू नये. यासाठी पोलिसांनी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा कदम आणि पोलीस नाईक उमेश भास्कर सानप यांनी ट्रान्सपोर्ट कडे आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही तक्रार एसीबीकडे आली असता त्यांनी सापळा रचत व ठरल्यानुसार कदम आणि सानप यांनी लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी दोन्ही महामार्ग पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहेत. दरम्यान लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यामुळे या प्रकरणी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करावी असे आवाहन यावेळी अँटी करप्शन ब्युरोच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा-काँग्रेस आमदार निलय डागांना दणका; बैतुल ऑइल मिल छापा प्रकरणातील आरोपींचा जामीन फेटाळला