नाशिक - पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या मित्राचा देखील पाय घसरला व दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) सायंकाळी नांदगाव येथे घडली. सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे (वय २०) व किशोर मधुकर चव्हाण (वय २५) असे या दोघांची नावे आहेत. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नांदगाव शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - सप्तश्रृंगी गडावरील घाटात अपघात झाल्याचे खोटे फोटो व्हायरल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
नांदगाव तहसील कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या दगडाच्या खदानीत पावसाचे पाणी साचलेले आहे. सायंकाळी सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे हा पाण्याजवळ गेला असता तो पाण्यात पडला. त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र किशोर मधुकर चव्हाण याने त्यास वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र, सिद्धार्थला पोहता येत नसल्याने त्याने आपला जीव वाचवण्यासाठी किशोरला पकडले. त्यामुळे किशोरलाही पाण्यात पोहण्यास अडचण येऊ लागली. हे दोघेही नंतर पाण्यात बुडाले. त्यानंतर या तरुणांना पाण्याबाहेर काढले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने तरुणांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत वेळ निघून गेली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस व नांदगाव नगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. परंतु, तोपर्यंत दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या घटनेची नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार राजू मोरे करत आहेत.