नाशिक - मालेगाव तालुक्यातील रामपुरा येथे शेततळ्यात पडून दोघा भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किशोर मुरलीधर सोनवणे (वय-३०) आणि ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (वय-२७) अशी मृतांची नावे आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सोनवणे बंधूचे शेत गावापासून दक्षिणेकडे मालेगाव रस्त्यावर आहे. वीजपुरवठा बंद असल्याने शेततळ्यातील पाणी हे पाईप जोडून हवेचा दाब निर्माण करत उताराच्या दिशेने विहिरीत टाकण्यासाठी दोघेही भाऊ प्रयत्न करत होते. याच गडबडीत लहान भाऊ ज्ञानेश्वर तळ्यात पडला. हे पाहताच किशोरने जवळ पडलेली ठिबकची नळी कंबरेला बांधत त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. घाईगडबडीत नळीचा बांधलेला वेढा सुटला व तोही पाण्यात बुडाला. शेततळ्यात वीस ते पंचवीस फूट पाणी होते. दुर्दैवाने दोघांना पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्य झाला.
ही घटना आजूबाजूला समजताच शेतकऱ्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगत होते. वडनेर खाकुर्डी पोलिसांनी पंचनामा केला असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
किशोर हा कंक्राळे येथील विनाअनुदानित माध्यमिक शाळेवर बिनपगारी शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्यांना पत्नी आणि दीड वर्षांचा लहान मुलगा आहे तर ज्ञानेश्वर हा अविवाहित होता. आई जिजाबाई अपंग तर वडील मुरलीधर वृद्ध आहेत. घरातील दोन्हीही करत्या मुलांच्या मृत्यूने कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत.