नाशिक - पिंपळगाव टोलनाक्याजवळ असलेल्या शिवारात पुष्ट्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. यामुळे काही महिन्यांपूर्वी झालेल्या बर्निंग कारचा थरार परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा अनुभवला आहे.
आगीत ट्रकसह शेकडो रुपयांचा पुठ्ठा जळून खाक -
नाशिकहून पिंपळगावच्या दिशेने जाणाऱ्या या मालवाहतूक ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुष्ट्याने भरलेल्या असल्यामुळे क्षणार्धातच आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, तोपर्यंत ट्रकमधील माल पूर्णपणे जळून खाक झाला होता.
काही महिन्यांपूर्वी धावत्या कारला लागली होती आग -
काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एका धावत्या कारला आग लागून वाहन चालकाचा दरवाजे लॉक झाल्याने होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. काल झालेल्या या घटनेने पिंपळगाववासीयांना या घटनेची आठवण झाली. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन