नाशिक: Swami Sagarand Saraswati Maharaj Passed Away: त्र्यंबकेश्वर आखाडा परिषद (trimbakeshwar akhada parishad) व पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज (Swami Sagarand Saraswati Maharaj) (वय १०१) हे आज ब्रह्मलीन झाले. त्यांच्या जाण्याने त्र्यंबकेश्वरच्या अध्यात्म क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. स्वामी सागरानंद सरस्वती महाराजांना संत, महंत आणि भाविकांच्या साक्षीने शनिवारी दुपारी चार वाजता आनंद आखडा गजलक्ष्मी मंदिर येथे समाधी दिल्या जाईल.
अल्प परिचय: स्वामी सागरानंद सरस्वती महाराज हे अत्यंत मनमिळावू, शांत व संयमी स्वभावाचे साधू म्हणून सर्वदूर परिचित होते. ते आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वरच्या सहा कुंभमेळ्यासह प्रयागराज व हरिद्वार येथील एकूण १९ कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ, ज्ञानवृद्ध, तपस्वी असे जूने जाणते महंत म्हणून त्यांची ख्याती आहे. प्रत्येक कुंभमेळ्यात त्यांनी शासकीय अधिकारी व साधू यांच्यात समन्वय साधला. त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यास गाढा होता. त्यांनी लाखो रुग्णांवर मोफत उपचार केले आहेत. अलीकडेच ते गजलक्ष्मी माता मंदिरात दर्शनाला आले असताना त्यांचे दर्शन भाविकांना झाले होते.
महंत शंकरानंद सरस्वती उर्फ भगवान बाबा हे ५० वर्षापासुन त्यांच्यासोबत आहे. महंत गणेशानंद सरस्वती, स्वामी गिरिजानंद सरस्वती, स्वामी सर्वनंद सरस्वती, महंत केशवानंद सरस्वती, महंत रामानंद सरस्वती हे साधू गण त्यांच्या सेवेत असत. तसेच देशभरातही त्यांचे हजारो शिष्य आहेत. अनेक प्रापंचिक साधकांनी त्यांची गुरुदक्षिणा घेतली आहे. गुरुपौर्णिमा व इतर उत्सवात त्यांच्या गणपतबारी आश्रमाला यात्रेचे स्वरूप यायचे. यावर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव त्यांच्या सह शेकडो भाविकांच्या उपस्थितीत झाला होता.