नाशिक- जिल्ह्यातील नांदगांवमध्ये व्याजाने दिलेले पैसे वसूल करण्यासाठी महिला सावकाराने आदिवासी दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. नांदगावातल्या पिंप्राळे येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पैशांसाठी महिला सावकाराने दुसऱ्या महिलेला विवस्त्र करण्याचादेखील प्रयत्न केलाय. या घटनेबद्दल सध्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिला सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पैसे परत देऊनही परत पैशाची मागणी...!
नांदगावमधील प्रिंप्राळे इथे एका गरीब आदिवासी दाम्पत्याने संगीता वाघ नावाच्या महिला सावकाराकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. यातील बरीच रक्कम पीडित कुटुंबाने परत केली होती. पण परत केलेली रक्कम हे फक्त व्याज असून मुद्दल अजून शिल्लक असल्याचा दावा महिला सावकाराने केला. त्यानंतर या महिला सावकाराने कर्ज घेतलेल्या महिला आणि पुरुषाला अमानुषपणे मारहाण केली. दाम्पत्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या प्रकाराची माहिती पोलिसांना समजली. हा प्रकार समजताच नांदगाव पोलिसांनी महिला सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या घटनेचा अधिक करत आहेत.
हेही वाचा- उल्हासनगरात महिलेची गळा चिरून हत्या; दोन संशयितांना घेतले ताब्यात
नोव्हेंबर महिन्यातला व्हिडिओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर जरी आता व्हायरल झाला असला तरी हा व्हिडीओ नोव्हेंबर महिन्यातला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी आम्ही गुन्हा नोंद केला आहे. आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत असून आरोपी महिला ही नांदगांवमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करते. लवकरच तिला अटक करू, असेही पोलिसांनी सांगितले आहे.
सावकार महिलेचे राजकीय सबंध...!
सदर महिला ही याआधी एका राजकीय पक्षाची तालुका पदाधिकारी होती. तसेच आताही ती एका सामाजिक संघटनेची पदाधिकारी असल्याचे समजते. या महिलेचे अनेक राजकीय पक्षांशी सबंध असल्याने कोणीही काहीच करू शकत नाही अशा अविर्भवात ती कायम वावरत असते.
हेही वाचा- हॉटेल चालकाला लुटणाऱ्या दोघांना अटक